वसई, मालवणीत सुविधा सुरू, मात्र तंत्रज्ञांची कमतरता
राज्य सरकारच्या जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना सरकारी किमतीत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी वसई व मालवणी (मालाड) येथे दोन रक्त साठवणूक केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी या ठिकाणी चार तंत्रज्ञांची गरज असताना एकच तंत्रज्ञ नेमण्यात आल्याने ही सुविधा मिळवताना रुग्णांना अडचणी येत आहेत. दुसरीकडे अन्य चार केंद्रे अद्याप सुरूच झालेली नाहीत.
रुग्णांना रक्तासाठी वणवण करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजनेअंतर्गत २०१४ साली मुंबईत आठ ठिकाणी रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ‘१०४’ या दूरध्वनी क्रमांकावर रुग्णालयांनी संपर्क साधला असता चार तासांच्या आत थेट रुग्णालयात रक्त पुरविण्याची सुविधा या योजनेंतर्गत देण्यात आली आहे. भायखळ्यातील जे.जे. महानगर रक्तपेढय़ातून मुंबई उपनगरातील रक्त साठवणूक केंद्रात आणले जाते.
रेल्वे रुग्णालय (भायखळा) व बीपीटी रुग्णालय (वडाळा) येथे साधारण दोन वर्षांपासून साठवणूक केंद्रे सुरू आहेत. गेल्या महिन्यात मालवणी उपजिल्हा रुग्णालय (मालाड) व महानगरपालिका रुग्णालय (वसई) येथेही नव्याने साठवणूक केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र अजूनही के. बी. भाभा रुग्णालय (कुर्ला), व्ही. एन. देसाई रुग्णालय (सांताक्रुझ), शताब्दी रुग्णालय (कांदिवली), ई.एस.आय. रुग्णालय मुलुंड) ही चार साठवणूक केंद्र प्रतीक्षेतच आहे.
सध्या वसई व मालाड येथील साठवणूक केंद्रात ५० ते ६० युनिट (पिशवी) रक्त जमा करता येऊ शकते. या परिसरात साठवणूक केंद्र असल्याने रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांची रक्तासाठीची वणवण थांबण्याची शक्यता आहे. वसई या भागात जवळपास रक्तपेढय़ा उपलब्ध नसल्याने रक्त साठवणूक केंद्रामुळे रुग्णांची रक्त मिळविण्यासाठी होणारी लूट थांबेल. मात्र ही सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञ रुजू होत नसल्याने सध्या या चारही केंद्रांत एक तंत्रज्ञच उपलब्ध आहे.
साठवणूक केंद्रात तंत्रज्ञांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात या तंत्रज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना रुजू करण्यात येईल.
डॉ. अरुण थोरात, साहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद