खोत भगिनींच्या प्रकल्पाची देशभरातून निवड

शहरात कुठल्याही मार्गावरील वाहतूक सिग्नलवर वाहन बंद केले जात नसल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शेकडो लिटर्स इंधन वाया जाते. सिग्नलवर सर्वानीच वाहन बंद केले तर पर्यावरण आणि इंधन बचत मोठय़ा प्रमाणात होऊ शकते, ही साधी संकल्पना नजरेपुढे ठेवून लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाबरोबरच ‘निळ्या’ रंगाच्या चौथ्या सिग्नलच्या संकल्पनेला आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई पोलीस दलातील सहायक आयुक्त दत्तात्रय खोत यांच्या कन्या ईशा आणि शिवानी यांनी हा प्रकल्प तयार केला आहे.

मुंबईत चौथ्या सिग्नलची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली तर वाहतुकीची कोंडी असलेल्या जंक्शनवरील एका सिग्नलवर सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांच्या कालावधीत एकूण पावणेदोन तास वाहन बंद राहील आणि त्यामुळे १५६ लिटर इंधन वाचू शकते आणि ३७१ किलोग्रॅम घातक कार्बन डायऑक्साइड वायूचे विसर्जन रोखले जाऊ शकते, असा या भगिनींचा दावा आहे. सुरुवातीला प्रदूषण मंडळाच्या परिषदेत ‘नॅशनल इन्वायरोमेंटल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड रिचर्स इन्स्टिटय़ूट’ म्हणजेच निरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी या भगिनींचे कौतुक केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास बळावला. अलीकडे त्यांनी परिवहन विभागाकडेही याचे सादरीकरण केले. हा प्रकल्प त्यांनी टेकफेस्टसाठीही पाठविला आणि त्यांच्या प्रकल्पाची पहिल्या २० प्रकल्पांमध्ये देशभरातून निवड झाली आहे.

घाटकोपरच्या पुणे विद्यार्थीगृहच्या विद्याभवन शाळेत नववीत शिकणाऱ्या ईशा आणि मानसशास्त्र विषयात पदवीशिक्षण घेत असलेल्या शिवानी या बहिणींनी हा प्रकल्प यार केला आहे. या प्रकल्पाच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दिल्ली येथील विज्ञान स्पर्धेसाठी ईशाची निवड झाली होती. डॉ. भाभा केंद्राची शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या ईशाने यासाठी काही वेगळा प्रकल्प हवा, या दिशेने विचार सुरू केला होता. बसमधून नेहमी जात असताना रस्त्यावर तसेच विशेषत: वाहतूक सिग्नलजवळ होणाऱ्या प्रदूषणाबाबत ती नेहमी चर्चा करायची. सिग्नलजवळ नक्कीच अधिक प्रदूषण होते, असे तिला वाटत होते. त्यासाठी तिने शिवानीची मदत घेतली. त्यातून हा प्रकल्प साकारला गेला. या प्रकल्पाचे मूल्यांकन करून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याबाबत राज्याच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिवांना लेखी पत्रही दिले आहे.