मुंबई : महापालिकेने माघी गणेशोत्सवातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनावर प्रतिबंध घातल्याने विसर्जनाचा मुद्दा चिघळला आहे. भाविकांकडून टीकेची झोड उठताच पालिकेने आता नवा मार्ग अवलंबित गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले असून पोलीस प्रशासनासमवेत मिळून मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी कृत्रिम तलावांतच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका प्रशासनाने नैसर्गिक जलस्त्रोसात पीओपीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रतिबंध केला. त्यानंतर अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती पुन्हा मंडळात आणून झाकून ठेवल्या. मात्र, पालिकेच्या या वर्तनामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेकांनी पालिकेवर टीका केली. त्यानंतर विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय निवडला असून संबंधित तलावांचे खोलीकरणही केले आहे.

यंदा १ फेब्रुवारी २०२५ पासून माघी गणेशोत्सव सुरू झाला. यावेळी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची हमी संबंधित गणेश मंडळांनी महानगरपालिकेकडे हमीपत्राच्या माध्यमातून दिली. त्याआधारे, अर्जांची छाननी करून माघी गणेश मूर्तींची स्थापनेसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. तरीही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नैसर्गिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. मूर्तींची उंची अधिक असल्याने नैसर्गिक विसर्जन स्थळांवर योग्यरितीने मूर्ती विसर्जन होईल, कृत्रिम तलावांची क्षमता पुरेशी नाही, असे या मंडळांचे म्हणणे होते. महानगरपालिकेच्या परिमंडळ सात अंतर्गत एकूण चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे यांची टीका

माघी गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींना विसर्जनासाठी अडवल्याने अद्यापही माघी गणपतींचे विसर्जन झालेले नाही. असे दुर्दैव आपण याआधी राज्यात कधाही बघितले नसल्याची टीका शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मराठमोळे हिंदू सण भाजपला पुसून काढायचे आहेत. त्यामुळे भाजप गप्प आहे. भाजप हिंदुत्वाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत आहे. त्यानंतर हिंदूंकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन रोखल्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.