अटक नाही, कठोर कारवाई

डेंग्यूचे डास पाळल्याबाबत महानगरपालिकेने शुक्रवारी कोणाहीविरोधात पोलिसात तक्रार केलेली नसली तरी आतापर्यंत केवळ मध्यमवर्गीयांपर्यंत मर्यादित असलेल्या कारवाईच्या नोटिसा गरीब वस्त्यांमधूनही देण्यास सुरुवात झाली आहे.

डेंग्यूचे डास पाळल्याबाबत महानगरपालिकेने शुक्रवारी कोणाहीविरोधात पोलिसात तक्रार केलेली नसली तरी आतापर्यंत केवळ मध्यमवर्गीयांपर्यंत मर्यादित असलेल्या कारवाईच्या नोटिसा गरीब वस्त्यांमधूनही देण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी देण्यात आलेल्या नोटिसांची पाहणी करून पालिका सोमवारी निर्णय घेणार आहे.
पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये २४५ कीटकनाशक नियंत्रक अधिकारी आहेत. आतापर्यंत डेंग्यू झालेल्या रुग्णांची माहिती समजल्यावर त्या परिसरात जाऊन धुम्रफवारणी करणे, डेंग्यूबद्दल माहितीची भित्तीपत्रके लावणे तसेच सोसायटय़ांना याबाबत सूचना देणे व एकापेक्षा अधिक वेळा डासांच्या अळ्या सापडल्यास नोटीस देण्याची कारवाई या अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. मात्र डेंग्यूच्या साथीचा उद्रेक, केईएममधील निवासी डॉक्टरचा डेंग्युमुळे झालेला मृत्यू आणि प्रसारमाध्यमांमधून होत असलेल्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कीटकनाशक नियंत्रक अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. झोपडय़ांच्या छतावर टाकलेले प्लास्टिक, टायर, भंगारातील सामानात साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या सापडण्याचे प्रमाण अधिक असूनही दंडाची रक्कम भरता येणार नसल्याने पालिका अधिकारी गरीब वस्त्यांमध्ये कारवाई करत नव्हते. शुक्रवारी मात्र शहरातील सर्वच गरीब वस्त्यांमधून डास पाळल्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत केवळ उच्चभ्रू सोसायटय़ांपुरती मर्यादित असलेली कारवाई आता झोपडीमालकांविरोधातही केली जात आहे. ज्याच्या झोपडीबाहेर, छतावर डासांच्या अळ्या सापडतील, त्या घरात राहणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे नारिंग्रेकर यांनी सांगितले.
अहवालानंतर कारवाई
पालिकेच्या सर्व कीटकनाशक नियंत्रकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल तीन दिवसानंतर मिळणार आहे. हा अहवाल पाहिल्यानंतर पालिकेकडून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bmc dengue

ताज्या बातम्या