शिवाजी मंडईची दुरुस्ती पालिकाच करणार असून नवीन बांधलेल्या मंडईत सध्याच्या व्यापाऱ्यांनाच जागा दिली जाईल, असे लेखी आश्वासन पालिकेकडून देण्यात येणार आहे. मूळ जागी परतण्याची शाश्वती नसल्याने मंडईतील व्यापारी जागा सोडण्यास तयार नाहीत.
डॉकयार्डची इमारत पडल्यानंतर पालिकेने सर्व धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा मूळ जागी परतण्याबाबत शाश्वती नसल्याने शिवाजी मंडईतील व्यापारी जागा सोडण्यास तयार नाहीत. याबाबत ट्रिझा किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली कोळी महिलांनी महापौरांची बुधवारी भेट घेतली. मंडईची दुरुस्ती झाल्यावर सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांचे पुनर्वसन पुन्हा शिवाजी मंडईत केले जाईल, असे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी दिले.
शिवाजी मंडईत सध्या १५७ किरकोळ विक्रेते, ८६ घाऊक व्यापारी, ५८ मासे व्यापारी आणि ३० पार्सल गाळेधारक आहेत. सध्या या सर्वासाठी महात्मा फुले मंडईत जागा तयार करण्यात आली आहे. त्यांना तिथे व्यापार करण्यास कोणाची हरकत नाही. शिवाजी मंडईचे दुरुस्तीचे काम झाल्यावर या व्यापाऱ्यांना पुन्हा तेथे जागा दिली जाईल. त्यासंबंधी लेखी पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त (विशेष) राजेंद्र भोसले यांनी दिली. या जागेवर खासगी विकासकाकडून मॉल बांधून घेतला जाणार असल्याच्या अफवा उठल्या आहेत, मात्र या मंडईचा विकास पालिकाच करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.