पालिका रुग्णालयात जाताना खिशात तंबाखू, गुटखा, सिगारेटचे पाकिट असेल तर रुग्णालयात प्रवेश देण्यात येऊ नये, असा विचार पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तंबाखूजन्य पदार्थाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णालय आणि परिसरात तंबाखूबंदीचा निर्णय लागू करण्याविषयी गंभीरपणे पावले टाकली जात आहेत.   
३१ मे रोजी असलेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त गुरुवारी टाटा स्मारक रुग्णालयात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुंबई महानगर रुग्णालयाच्या संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी हे सुचित केले.
शहरात तंबाखूबंदी लागू करता येत नसली तरी किमान महानगरपालिकेच्या रुग्णालयात तंबाखू किंवा विडी-सिगारेट घेऊन येण्यास बंदी करण्याचा निर्णय घेता येईल. याबाबत महापौरांना पत्र लिहून निर्णय घेण्याची विनंती करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यालये, उपाहारगृह, सार्वजनिक ठिकाणांवर सिगारेट बंदीचा हुकूम लागू झाल्यावर अनेक ‘पॅसिव्ह स्मोकर्स’नी (इतरांच्या सिगारेटचा धूर नाईलाजाने शरीरात घ्यावे लागणारे) सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र पानाच्या पिचकाऱ्या आणि गुटख्याच्या पाकिटांचा कचरा कमी झाला नव्हता. रस्ते, पादचारी पूल, रेल्वे स्थानके, बसथांबे, इतकेच काय पण सरकारी रुग्णालयाच्या भिंती आणि कोपरेही लाल पिचकाऱ्यांनी आणि गुटख्याच्या पाकिटांनी सजलेल्या दिसतात. आताही रुग्णालयात धूम्रपान करण्यास बंदी आहे. सुरक्षारक्षक त्याबाबत तपासणीही करतात. मात्र बंदी लागू झाल्यावर सर्वच तंबाखूजन्य पदार्थ रुग्णालयात नेण्यास मज्जाव केला जाणार आहे.
तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळते याची कल्पना असूनही तो आपल्याला होणार नाही, असे वाटत राहिल्याने व्यसन सुटत नाही, असे मेंदू आणि नाक कर्करोग विभागाचे डॉ. पंकज चतुर्वेदी या चर्चासत्रात म्हणाले. तंबाखूजन्य पदार्थ महाग झाल्यास त्याची विक्री घटेल तसेच एक-दोन रुपयात मिळणाऱ्या पाउचऐवजी जास्त वजनाचे (आणि त्यामुळे अधिक किंमतीचे) पॅकेज बनवण्यास भाग पाडल्यास लहान मुले त्यापासून दूर होऊ शकतील, असा विश्वास कर्करोग प्रतिबंधक विभागाचे डॉ. सुरेंद्र शास्त्री यांनी व्यक्त केला.