करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आता सावध झाली आहे. ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर आता बारकाईने नजर ठेवली जाणार असून पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतरांना लागण होऊ नये, याचीही काळजी घेतली जाणार आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेचा अॅक्शन प्लॅन सांगितला. ओमायक्रॉनचा प्रसार मुंबईत होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिका सतर्क झाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी ओमायक्रॉन प्रादुर्भाव रोखण्यात मुंबईकरांच्या सहकार्याची अपेक्षाही केली आहे.

काय आहेत उपाययोजना आणि खबरदारीचे उपाय? महापौर सांगतात…

  • करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपत्कालीन कक्षाला पाठवली जाईल.
  • सोप्या पद्धतीने ही यादी तयार करता यावी यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर वापरलं जाईल.
  • आपत्कालीन कक्षाकडून ही यादी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांमधल्या वॉर रुमला या प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाईल.
  • वॉर रुममधून या प्रवाशांशी सलग सात दिवस संपर्क ठेवण्यात येईल तसंच त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं जाईल.
  • हे प्रवाशी विलगीकरणाचे नियम नीट पाळत आहेत का याची खबरदारी घेतली जाईल.
  • प्रत्येक वॉर्डात १० रुग्णवाहिका तयार ठेवल्या जातील, त्याचप्रमाणे महापालिकेची पथकं तयार केली जातील.
  • ही पथके प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करतील.
  • हे प्रवासी राहत असलेल्या सोसायटीलाही पत्र दिलं जाईल आणि खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात येतील.

हेही वाचा – करोना जम्बो केंद्रे चालवायची कशी?

महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

यासोबतच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे. बाहेरच्या देशातून, धोकादायक देशांमधून आपल्या घरात, सोसायटीमध्ये, परिसरात एखादी व्यक्ती आली असेल किंवा आपण स्वतः आला असाल तर त्याची माहिती प्रशासनाला देण्याची विनंती महापौरांनी मुंबईकरांना केली आहे.

धोकादायक देशांतून १० ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३,१३६ प्रवासी आले आहेत. त्यातील २,१४९ प्रवाशांची करोना चाचणी झाली आहे. तर त्याच्यांपैकी १० प्रवासी हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.