पालिका विभाग कार्यालयांच्या हद्दीतील गटारे- मोऱ्यांची दुरुस्ती, छोटय़ा-मोठय़ा नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबईतील वृक्ष छाटणीची कामे देऊन त्यांच्यावर तब्बल ४२ कोटी रुपयांची खैरात करण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. तसेच खासगी मालमत्तांवरील झाडांचे अन्यत्र पुनरेपण करण्यासाठी तिप्पट रक्कम वसूल करण्याचा पालिकेचा मानस आहे.
२००८ मध्ये करण्यात आलेल्या गणनेनुसार मुंबईत १९,१७,८४४ वृक्ष आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईत विकासकामाआड आलेल्या असंख्य वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. काही वृक्षांचे पुनरेपण करण्यात आले, तर काहींच्या बदल्यात नव्या झाडांचे रोपण करण्यात आले. मात्र देखरेखीची व्यवस्था नसल्याने त्याच्या सद्यस्थितीची माहिती पालिकेकडे नाही. त्यामुळे मुंबईतील नेमकी वृक्षसंख्या पालिकेलाच ठाऊक नाही.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या, तसेच मृत आणि धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची पालिकेमार्फत छाटणी केली जाते. पालिकेच्या कामगारांवर ही जबाबदारी सोपविण्यात येते. आता हेच काम खासगी कंत्राटदारांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एका अशा एकूण २४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वृक्ष छाटणी आणि तोडलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावण्यासाठी २४ कंत्राटदारांना ४२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. खासगी मालमत्तांवरील वृक्ष छाटणी अथवा वृक्षांचे अन्यत्र पुनरेपण कंत्राटदारांमार्फत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी कंत्राटदाराने नमूद केलेल्या दराच्या तीनपट रक्कम जमीन मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
* २००८ च्या गणनेनुसार शहरात ३,७६,०२०,पश्चिम उपनगरात ९,५२,१०३, तर पूर्व उपनगरात ५,८९,७२१ वृक्ष आहेत़
* पालिकेने कुलाब्यापासून वांद्रय़ापर्यंत नियुक्त केलेल्या नऊ कंत्राटदारांवर ११,७०,४५,२५२ रुपयांची खैरात करण्यात येणार आहे.
* पश्चिम उपनगरांत नऊ, तर पूर्व उपनगरांत सहा कंत्राटदारांवर अनुक्रमे १८,२६,९६,७७३ रुपये व १२,०५,२२,९३६ रुपयांची उधळपट्टी होणार आहे.