देशातील पहिली एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्यादृष्टीने हेलिकॉप्टर सेवेसाठी लॅण्डींगच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयांत दाखल करता यावे, यासाठी ही एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार आहे.
अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळावेत, त्यांना रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेने एअर अॅम्बुलन्स सेवा सुरु करण्याचा विचार केला आहे. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवण्यासाठीही या सुविधेचा वापर केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठी संभाव्य लॅण्डींगच्या ठिकाणांचाही शोध सुरू केला आहे. तसेच लवकरच हेलिकॉप्टर ऑपरेटर्सकडून यासाठी अर्जही मागवले जाणार आहेत. ही सेवा मोफत असणार आहे. तज्ज्ञांनी मात्र, या सुविधेच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि ते उतरवण्यासाठी ओव्हल मैदानाचा विचार केला जात आहे. याशिवाय रुग्णालयांच्या छतांवरही हेलिकॉप्टर उतरवता येतील का, याचीही चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे मात्र, तज्ज्ञांनी ही योजना अस्पष्ट असल्याचे मत मांडले आहे. महापालिका प्रशासनाकडून या सुविधेसाठी येणाऱ्या खर्चाचा आणि इतर बाबींचा ठोस विचार केल्यानंतरच या सेवेची अंमलबजावणी शक्य होणार आहे. रुग्णांची वाहतूक करणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च कोण देणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अगाऊ नोंदणी केलेल्या दोन इंजिनच्या हेलिकॉप्टरचे शुल्क सव्वा लाख रुपये प्रतितास असते. तर एका इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी प्रतितासाला ८० हजार रुपये शुल्क आकारले जाते. काही मिनिटांसाठी सेवा दिली तरी, ऑपरेटर एक तासाचे शुल्क घेतात. त्यामुळे लाखोंच्या घरात येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.
अलिकडेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ एका पक्ष्याला वाचवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाल्याची घटना घडली होती. जखमींना ऐरोली येथे नॅशनल बर्न्स सेंटर येथे नेताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना उपचार मिळण्यास उशीर झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा विचार केला, असे सांगण्यात येते. या जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात आलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन आणि मुख्य अग्निशमन अधिकारी पी. रहांगदले हे या योजनेवर काम करत आहेत. घटनेनंतर काही तासांतच जखमींना उपचार मिळाले तर ते वाचण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुंदन यांना लगेच मान्यता दिली.