scorecardresearch

प्लास्टिक टाळा, पैठणी मिळवा!

‘प्लास्टिकची पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ची नामी शक्कल पालिकेने लढवली आहे.

प्लास्टिक टाळा, पैठणी मिळवा!
‘प्लास्टिकची पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ची नामी शक्कल पालिकेने लढवली आहे.

आठवडा बाजारांतून प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्यासाठी महापालिकेची योजना

शेतकऱ्यांच्या मळ्यातल्या ताज्या फळे आणि भाजीला मुंबईत आठवडा बाजाराच्या माध्यमातून थेट किरकोळ ग्राहक मिळवून देण्याबरोबरच आता या बाजारांमधून प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यासाठी ‘प्लास्टिकची पिशवी टाळा आणि पैठणी जिंका’ची नामी शक्कल पालिकेने लढवली आहे. बाजारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. परंतु या योजनेमुळे किमान आठवडा बाजार प्लास्टिक पिशवीमुक्त करण्याची पालिकेची योजना आहे.

मुंबईकरांना स्वस्तामध्ये थेट मळ्यामधील ताजी भाजी मिळावी आणि शेतकऱ्यांची दलालाकडून होणारी फसवणूक थांबावी या उद्देशाने पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने चार-साडेचार महिन्यांपूर्वी डोंगरीजवळील सॅण्डहर्स्ट रोड येथील सीताराम शेणॉय उद्यानाजवळ आणि डोंगरी मराठी शाळेसमोर पदपथावर आठवडा बाजार सुरू केला. दर गुरुवारी भरत असलेल्या या आठवडा बाजारात नाशिक जिल्ह्य़ातील विंचर गावातील किरण शिरसाट, समाधान चौधरी, नितीन लोणारी आणि कमलेश निकाळे आणि त्यांचे सहकारी शेतकरी नित्यनियमाने ताज्या भाजीचा पुरवठा करत आहेत. इतकेच नव्हे तर आता गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, निरनिराळ्या डाळीही या आठवडा बाजारात मिळू लागल्या आहेत. या परिसरातील रहिवाशांना आठवडा बाजाराच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तू स्वस्तामध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

परंतु, आता एक पाऊल पुढे जात रहिवाशांना स्वस्तात भाजी आणि धान्य उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘प्लास्टिक हटाव’ मोहिमही हाती घेण्याचा निर्णय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सध्या या आठवडा बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळू लागली आहे. अनेक ग्राहक प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन खरेदीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आठवडा बाजारात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मात्र ग्राहकांच्या मानसिकतेत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने ‘प्लास्टिक हटाव’ मोहिमेसाठी अभिनव योजना आखली आहे.

बंदी असूनही सर्रास वापर

२६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या प्रलयकारी पावसामुळे अवघी मुंबई जलमय झाली होती. पाण्याचा प्रवाह अडवण्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठा हात होता. त्यामुळे पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली. मात्र आजही फेरीवाले आणि दुकानदारांकडून सर्रास ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे.

अशी मिळणार पैठणी

’ आठवडा बाजारात प्लास्टिकऐवजी कापडाची पिशवी घेऊन येणाऱ्या ग्राहकाला एक कूपन देण्यात येणार आहे. सोडत पद्धतीने एक कूपन काढून विजयी महिलेला पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

’ चार आठवडय़ांनी आठवडा बाजारातच एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून कलावंतांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देण्यात येणार आहे.

’ धान्य खरेदीसाठी येणाऱ्यांकरिता सुरुवातीला ही योजना राबवण्यात येणार आहे. हळूहळू भाजी खरेदी करणाऱ्यांसाठीही ही योजना लागू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

’ या निमित्ताने किमान आठवडा बाजारातून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार होऊ शकतील, असा पालिका अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

वारंवार जनजागृती करूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होतच आहे. म्हणून आठवडा बाजाराच्या निमित्ताने प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार करण्याचा विचार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना प्रोत्साहन मिळेल आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढेल.

– उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त,

‘बी’ विभाग कार्यालय

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-04-2017 at 04:07 IST

संबंधित बातम्या