वाहनचालकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर

मुंबई : अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिकेने पी. डि’मेलो मार्गावरील यलो गेट आणि इंदिरा डॉकजवळील धोकादायक बनलेला पादचारी पूल पाडून वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या डोक्यावरील टांगती तलवर दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पादचारी पूल धोकादायक बनल्याचे पालिकेने मुंबई पोर्ट ट्रस्टला कळविले होते. हा पूल पालिकेनेच बांधल्यामुळे त्यांनीच तो तोडावा असे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून कळविण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते.

कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी परिसरातून मध्य मुंबईत झटपट पोहोचविणारा रस्ता म्हणून पी. डि’मेलो मार्ग ओळखला जातो. दक्षिण मुंबईत पूर्व उपनगरे आणि वाशीला झटपट पोहोचता यावे यासाठी याच मार्गावर पूर्व मुक्त मार्ग उभारण्यात आला. आजघडीला दक्षिण मुंबईमधून चेंबूरला जाण्यासाठी मोठय़ा संख्येने वाहने पूर्वमुक्त मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पी. डि’मेलो मार्गावर कायम वाहतुकीची वर्दळ असते. पादचाऱ्यांना हा मार्ग ओलांडताना अपघात होऊ नये, यासाठी काही वर्षांपूर्वी पालिकेने या मार्गावरील यलो गेट आणि इंदिरा डॉकजवळ पादचारी पूल उभारला. या पुलाचा सुरुवातीला वापर होत होता. मात्र, नंतर पादचारी या पुलावरून जाणे टाळू लागले. पालिकेनेही पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने हा पूल धोकादायक बनला.

ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेच्या एका विभागाने हा पादचारी पूल पाडून टाकण्यात यावा असे पत्र पालिकेने मुंबई पोर्ट ट्रस्टला २०१७ मध्ये पाठविले. हा पादचारी पूल पालिकेने बांधल्यामुळे त्यांनीच तो तोडावा असे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पालिकेला कळविण्यात आले होते. मात्र आजही हा पूल धोकादायक अवस्थेत उभा आहे. पादचाऱ्यांचा वावर नसल्यामुळे आता काही गर्दुल्ले आणि काही समाजकंटकांनी या पुलाचा ताबा घेतला आहे.

अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पालिकेला खडबडून जाग आली असून आता पालिकेने हा धोकादायक पादचारी पूल पाडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये हा पादचारी पूल पाडून वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करण्यात येणार आहे.

हा पादचारी पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-अजोय मेहता, पालिका आयुक्त