हागणदारीमुक्तीसाठी महापालिकेचे प्रयत्न
मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना राबवणाऱ्या पालिकेतर्फे शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८३ शौचालयांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वडाळा, दादर, गोरेगाव, कुलाबा, देवनार या भागांसह शहरातील अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या या शौचालयांमध्ये एकूण १२१५ शौचकुपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरात आजमितीला ३५ हजार शौचकुपे आहेत. परंतु, त्यावर अवलंबून असलेले नागरिक पाहता ही संख्या दुप्पट होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई शहर हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, अनेक भागांत आजही उघडय़ावर प्रातर्विधी सुरूच आहेत. डिसेंबरमध्ये पालिकेने ११८ ठिकाणी २ हजार ९३९ शौचकुपांची व्यवस्था केली होती. मात्र तरीही उघडय़ावर शौच करण्याचे प्रकार कमी न झाल्याने पालिकेने आता आणखी ८३ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था केली आहे. यात सामुदायिक, सशुल्क तसेच फिरत्या शौचालयांचा समावेश आहे. या सर्व शौचालयांमध्ये वीज व पाणी पुरवठा सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील पूर्व मुक्त मार्गाजवळ व परळ परिसरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने तयार केलेला माहितीपट व ध्वनिफीत यांचेही लोकार्पण याचवेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. सामुदायिक शौचालयात महिना पन्नास रुपये शुल्क व सशुल्क ठिकाणी प्रत्येक वेळी दोन रुपये शुल्क आकारले जाते, असे किरण दिघावकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपर्यंत शहरात सुमारे २ हजार सार्वजनिक शौचालये व दीड हजार सशुल्क शौचालये उपलब्ध होती. या शौचालयांमध्ये उपलब्ध असलेली साधारण ३० ते ३५ हजार शौचकूपे शहरातील तसेच रोजगारासाठी शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी अत्यंत अपुरी असून ३०० हून अधिक व्यक्तींसाठी एक शौचकूप एवढे भयावह प्रमाण आहे. प्रत्येकी ५० व्यक्तींमागे एक शौचालय असणे गरजेचे आहे, असे कोरो संस्थेच्या कार्यकर्त्यां मुमताज शेख म्हणाल्या.
सर्वाधिक शौचालये
- वडाळा (१५९), दादर (१४०), गोरेगाव (१३५), कुलाबा (१०४), देवनार(९६)
- ३१ सामुदायिक शौचालये (६५६ शौचकुपे)
- १० सशुल्क शौचालये (१६२ शौचकुपे)
- ४२ फिरती शौचालये (३९७ शौचकुपे)