मुंबई: ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाने पडताळणीसाठी सक्षम ॲपवरून निवडणूक आयोगाकडे हा अर्ज करण्यात आला होता. ‘ओटीपी’साठी जो मोबाईल क्रमांक वापरला तोही चुकीचा होता. निवडणूक अधिकारी आपल्याकडे विचारणा करण्यासाठी ‘मातोश्री’वर आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. निवडणूक आयोगात काय चालले आहे हे त्याचे बोलके उदाहरण. पक्ष चोरला, चिन्ह चोरले, वडील चोरायचा प्रयत्न केला, त्यानंतर आता आपली आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा हा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी मदारयादीतील घोळावर बोट ठेवले. भाषणाच्या सुरुवातीला तमाम देशभक्त आणि खऱ्या मतदार बंधू आणि भगिनींनो असा उल्लेख करीत संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्ष एकवटले असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची ही एकजूट आहे. ही ठिणगी पाहताय , या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकतो. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे, असा इशारा त्यांनी मतचोरी करणाऱ्यांना दिला. राज ठाकरे यांनी पुराव्याचा डोंगरच दिला आहे. रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येतच आहेत. पण निवडणूक आयोग त्याची दखलच घेत नाही. निवडणूक आयोगह हा सत्ताधाऱ्यांचा नोकर झाल्याची टीका त्यांनी केली. सर्व एकत्र आले पण सत्ताधारी आलेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले होते की, लोकसभेच्या वेळेला विरोधी पक्षांनी कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश करेन. एकदाच त्यांनी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा. मुख्यमंत्री असे बोलतात याचा अर्थ तेसुद्धा मतांची चोरी होतेय हे मान्य करतात, असा टोला त्यांनी लगावला.
पुरावे घेऊन न्यायालयात जाणार
आम्ही निवडणुका होऊच देणार नाही असे म्हणत नाही. आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. लोकशाहीच्या मार्गाने यांना ठोकायला आम्हीसुद्धा आसुसलेलो आहोत. पण सदोष याद्या आणि मतचोरी करून निवडणुका घेणार असाल तर जनतेने निवडणुका घ्यायच्या की नाही हे जनतेने ठरवावे. मतचोरीचे खूप पुरावे आपल्याकडे आहेत. हे सर्व पुरावे घेऊन आपण लवकरच न्याालयात जाणार आहोत. न्यायालयातही आपल्याला न्याय मिळतो की नाही याचीही परीक्षा होईल. शिवसेनेचा खटला तिथे तीन -चार वर्षे सुरूच आहे, पण आता मात्र सर्व साक्षी-पुरावे दिल्यानंतर आम्हाला न्याय हवाय. त्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आम्हाला आहेच, पण जनतेच्या न्यायालयात या मतचोरांचे काय करायचे, याचा निर्णय घ्यायला जनता सक्षम आहे, असे सांगताना यापुढे मतचोर दिसेल त्याला तिथेच फटकवा. लोकशाहीच्या मार्गाने ठोका, असे ते म्हणाले.
मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेसोबत युतीचे संकेत दिले. आम्ही मराठीसाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहेत. पण आम्ही एकत्रितपणे पुढे जात असताना भक्कमपणे साथ देणे तुमचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी मराठी जनतेला केले. ही मूठ महाराष्ट्राने आवळलेली आहे. जर मतचोरी करून तुम्ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
