मुंबई : बॉलिवुडच्या सगळ्यात मोठ्या कपूर खानदानातील चिरंजीव म्हटल्यावर कुटुंबाचा वारसा पुढे नेला पाहिजे, ही अपेक्षा असणे साहजिक आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून या अपेक्षेचे ओझे आपल्यावरही होते. मी जे चित्रपट केले ते माझ्या वडिलांना अजिबात आवडले नाहीत. माझ्या निवडीवर पहिला आक्षेप त्यांनीच घेतला होता, अशी कबूली अभिनेता रणबीर कपूरने मनमोकळेपणाने दिली.
‘शमशेरा’ हा रणबीर कपूरचा बहुचर्चित, बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच आपटला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने ‘बी 4 यू’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने मनमोकळ्या गप्प मारल्या. कपूर खानदानाचा वारसा आणि बॉलिवूडचा हिरो होण्यासाठी कशा प्रकारचे चित्रपट करता, यावरून वडील ऋषी कपूर यांच्याबरोबर झालेला वाद याबद्दलच्या आठवणीना त्याने वाट मोकळी केली.
मी जेव्हा अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले तेव्हापासून कपूर खानदान आणि कुटुंबाचा वारसा याबद्दल कायम ऐकत आलो आहे. हा वारसा पुढे नेण ही आपली जबाबदारी आहे असे मला वाटायचे. पण सुदैवाने चित्रपटसृष्टीत मला माझी ओळख निर्माण करायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर कुठल्या प्रकारचे चित्रपट करायला हवेत याची मला चांगली जाण होती, असे रणबीरने स्पष्ट केले. त्याने सुरुवातीलाच ‘सावरिया’, ‘वेक अप सिद’, ‘बर्फी’सारखे चौकटी बाहेरचे चित्रपट केले होते. याच चित्रपटांनी त्याला उत्तम अभिनेता म्हणून लौकिक मिळवून दिला हे सगळ्यांना माहीत आहे.
हेच चित्रपट रणबीर आणि ऋषी कपूर यांच्यातील वादाचे कारण बनले. तू हे काय करतो आहेस?, तुला जर मुख्य प्रवाहातील चित्रपटांचा हिरो व्हायचे असेल तर ‘बर्फी’, ‘रॉकस्टार’सारखे चित्रपट करून काहीही होणार नाही, असे वडिलांनी आपल्याला सांगितले होतेे, असे रणबीर म्हणाला. पण चित्रपटांच्या बाबतीत आपण कोणाचा सल्ला मनावर घेतला नाही. आपल्याला जे मनापासून योग्य वाटले, ज्या व्यक्तिरेखा आपण उत्तम साकारू शकतो असे वाटले तेच चित्रपट मी केले. कपूर कुटुंबात जन्माला आलो म्हणून मला हवे तसे यश मिळेल, असा विचार मी कधीच केला नाही, असे त्याने सांगितले. कपूर कुटुंबाचे चित्रपटसृष्टीतील योगदान आणि परंपरा यांचा मला खूप अभिमान आहे, पण म्हणून केवळ कुटुंबाच्या नावावर पुढे जाणे वा तसे गृहीत धरणे मी कधीही केले नाही, असेही रणबीरने सांगितले.