मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब असल्याचा सोमवारी सकाळी निनावी दूरध्वनी येताच सुरक्षेसाठी तैनात पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी साडेअकरापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पोलिसांनी उच्च न्यायालयाचा प्रत्येक कोपरा तपासून काढला. मात्र साडेचार तासांच्या या तपासणीनंतर ही अफवा असल्याचे अखेर उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
उच्च न्यायालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीमध्ये असलेल्या पोलिसांच्या विस्तारित क्रमांकावर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास म्हणजेच न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनी एक निनावी दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या महिलेने आपण मेधा पाटकर बोलत असल्याचे सांगितले. तसेच वांद्रे स्थानकाजवळ आपण दोघा व्यक्तींना बोलताना ऐकले आणि ते उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याबाबत ते एकमेकांशी बोलत असल्याचे तिने फोन उचलणाऱ्या पोलिसाला सांगितले व फोन ठेवून दिला. दूरध्वनी लॅण्डलाइनवर आल्याने तो नेमका कुठून व कुणी केला हे कळू शकले नाही. परंतु या फोनची गंभीर दखल घेत संबंधित पोलिसाने ही माहिती उच्च न्यायालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केशव शेंगळे यांना तात्काळ कळवली. त्यानंतर त्यांनी उपायुक्त रवींद्र शिसवे आणि सहाय्यक आयुक्त भारत वरळीकर यांना संपर्क साधून त्याबाबत कळवले. नंतर त्यांनी मुख्य न्यायमूर्तीच्या अनुपस्थितीत काम पाहणाऱ्या न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांना त्याची माहिती दिली. तसेच तपासणी करण्याच्या हेतूने न्यायालयाचे कामकाज बंद करण्याची विनंतीही केली. मात्र न्यायमूर्ती कापसे-ताहिलरामाणी यांनी कामकाज बंद करण्याची काहीही गरज नसल्याचे सांगत कामकाज सुरू असतानाच तपासणी करण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. चार श्वानपथकांच्या सहाय्याने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती. साडेचार तासांच्या तपासणीनंतर अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले.