मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला गुजरातमधून अटक केली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी वांद्रे – कुर्ला संकुल पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. विक्रम सिंह झाला (३४)  असे अटक आरोपीचे नाव असून गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील रहिवासी असलेला विक्रमसिंह वाहनचालक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका अज्ञात इसमाने सोमवारी दुपारी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. काही तासांनंतर अज्ञात इसमाने शाळेच्या प्रवेशद्वारावर दुसरा दूरध्वनी केला होता. अज्ञात इसमाने केलेल्या दूरध्वनीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने या घटनेची माहिती वांद्रे – कुर्ला संकुल पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण शाळेची तपासणी केली.

हेही वाचा >>> मालाडमधील १०० वर्षे जुनी इमारत काळाच्या पडद्याआड जाणार

वांद्रे -कुर्ला संकुल येथील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत पोलिसांनी तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, धमकीच्या या फोनमुळे शाळेत भीतीचे वातावरण पसरले  होते. याप्रकरणी वांद्रे – कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी गुजरातमधील रहिवासी विक्रम सिंह झाला याला अटक करण्यात आली आहे. तसेच, हा धमकीचा फोन प्रसिद्धी मिळविण्यासाठी केल्याचे त्याने चौकशीत सांगितले. धमकीचा फोन केल्यानंतर पोलीस आपल्याला पकडतील.

आपले छायाचित्र आणि नाव प्रसारमाध्यमांमध्ये छापून येईल. संपूर्ण देशात आपले नाव होईल, म्हणून हा फोन केला असे विक्रम सिंहने पोलिसांना सांगितले. आरोपी विक्रम सिंहच्या कबुलीनंतर वांद्रे – कुर्ला संकुल पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb threat to dhirubhai ambani international school arrested from gujarat mumbai print news ysh
First published on: 12-01-2023 at 11:42 IST