मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत दाखल केलेले प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर केल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेली याचिका निकाली काढली.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांनी केलेली याचिका निकाली काढली. या प्रकरणी न्यायालयाने मुश्रीफ यांना अटकेपासून आधीच अंतरिम दिलासा दिला होता.
कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुश्रीफ यांच्याविरुद्ध विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा ‘राजकीय हेतुने प्रेरित षडयंत्र’ असल्याचे सांगून तो रद्द करण्यात यावा, तसेच निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुश्रीफ यांनी केली होती.