कुर्ल्यातील नेहरू नगरमधील इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या अखिलेश माजीद (३६) या तरुणाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्याच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. राजावाडी रुग्णालयातील जखमी तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना बुधवारी घरी पाठविण्यात आले.

इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकल्याने चौघे जखमी झाले होते. यापैकी गंभीर जखमी अखिलेश माजीदला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखिलेशच्या डाव्या गुडघ्याचे हाड तुटले असून येथे गंभीर दुखापत झाली आहे. गुडघ्याला जोरात मार लागल्याने हाड दिसत होते. तसेच जखमेत मोठ्या प्रमाणावर चिखल गेला होता. तसेच त्याच्या उजव्या पायाच्या पोटरी जवळील हाडही तुटले आहे. या जखमेमध्येही खूप माती गेली होती.

रुग्णालयात दाखल करताच त्याच्या पायाच्या दोन्ही जखमा स्वच्छ करण्यात आल्या. डाव्या गुडघ्याच्या हाडावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उजव्या पायालावरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पायांना प्लास्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे पुढील चार ते सहा आठवडे त्याला चालता येणार नाही, अशी माहिती लोकमान्य टिळक रुग्णालयातील अस्थिभंग विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद गोरेगावकर यांनी दिली.

तसेच, अखिलेशच्या खांद्यालाही मोठी दुखापत झाली आहे. ही दुखापत कितपत गंभीर आहे, याच्या तपासण्या सध्या सुरू आहेत. त्यामुळे त्याला अजून काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येईल, असे डॉ. गोरेगावकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले –

राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या देवकी बलिया (४२) आणि त्यांचा मुलगा प्रीत बलिया(१७) यासह चैहफ बसपाल (३६) या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर झालेली आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.