गणेशोत्सवाचे आकर्षण केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशातील लोकांनाही असते. या काळात अनेक परदेशी नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रात हजेरी लावतात. त्यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असतो. आजच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज असलेली क्रिकेटपटू ब्रेट ली याने प्रतिष्ठापनेच्या दिवशी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. मुंबईच्या सायन येथील जीएसबी मंडळाच्या गणपतीला भेट देत ब्रेट ली ने बाप्पाचे दर्शन घेतले. मुंबईमध्ये सकाळी १२ च्या दरम्यान त्याने ही भेट दिली. भारतात ब्रेट ली चे असंख्य चाहते असून त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
भारतीय संस्कृतीचे ब्रेट ली याला विशेष आकर्षण असल्याचे आपण याआधीही अनेकदा पाहिले आहे. भारतीय वेशातील त्याचे फोटो याआधीही समोर आले होते. त्याचप्रमाणे आजही बाप्पाच्या दर्शनाला आलेला ब्रेट ली याने मोतीया रंगाचा झब्बा-पायजमा घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. तसेच त्याने भारतीय परंपरेप्रमाणे नमस्कार केल्याचेही यामध्ये दिसत आहे. जीएसबीचा गणपती हा मुंबईतील एक नामांकित गणपती म्हणून ओळखला जातो. श्रीमंत आणि दानशूर अशी या मंडळाची विशेष ओळख आहे. या गणपतीला यंदा ७० किलोहून अधिक सोन्याचे दागिने घालण्यात आले आहेत. तर ३०० किलोहून अधिक चांदीची सजावट वापरण्यात आली आहे. इतके अलंकार असल्याने गणपतीच्या सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.