मुंबई : गतवर्षीप्रमाणे यंदाही मंडपांसाठी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा २ हजार रुपये दंड माफ करावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्याकडे केली. खड्ड्यांसदर्भातील दोन हजार रुपये दंड माफ होईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सव आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना १५ हजार रुपये दंड आकारण्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले होते. मात्र, महापालिकेच्या या निर्णयाला समन्वय समितीने विरोध केला होता. त्यानंतर दंडाची रक्कम पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपये करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे गणेशोत्सव मंडळांवर खड्ड्यांसाठी आकाराला जाणारा दोन हजार रुपये दंडही माफ करावा, अशी मागणी बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून खड्ड्यांसाठीचा दंड माफ होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
पीओपी मूर्तीसंदर्भात कायमस्वरूपी दिलासा मिळावा, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली. लालबागचा राजा मंडळाजवळ अग्निशमन दलाचे बंब उभे असतात. त्यासाठी दिवसाला सव्वा लाख रुपये शुल्क आकारले जाते, तेही माफ करावे. गेली ३० वर्षे अनंत चतुर्दशीला मिळणारी सुट्टी पूर्ववत करावी, तसेच कर आकारणी करताना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयानुसार कमर्शिअल असेसमेंट केले जाते, त्यात सूट मिळावी, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या, असे समन्वय समितीने अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह अन्य अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सवस समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.