मुंबई : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या स्पर्धेत बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अव्वल ठरले. या पाठोपाठ झोपु प्राधिकरणाला १०३ व्या स्काॅच परिषदेत प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरी केंद्रित डिजिटल सेवा उपक्रमासाठी झोपु प्राधिकरणाला प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याची जबाबदारी झोपु प्राधिकरणावर आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम या प्राधिकरणामार्फत सुरू आहे. आजपर्यंत लाखो झोपडीधारकांना पुनर्वसित इमारतीत घरे देण्याचे काम झोपु प्राधिकरणाने केले आहे. तर दुसरीकेड झोपु योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि झोपडीधारकांना आपल्या योजनेतील माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी अनेक सुविधा संगणकीय पद्धतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर झोपु योजनेतील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कार्यालयीने सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत १०० दिवसांत प्राधिकरणाने अनेक नाविन्यपूर्ण बदल करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या कामाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. २० सप्टेंबरला नवी दिल्लीतील सिल्व्हर ओक इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे पार पडलेल्या १०३ व्या स्काॅच परिषदेत झोपु प्राधिकरणाला नागरी केंद्रित डिजिटल सेवेसाठी प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार झोपडपट्टीवासियांचा विश्वास, सहभाग आणि सहकार्यास समर्पित करून झोपु प्राधिकरणाने यापुढेही लोकाभिमुख आणि डिजिटल सक्षम सेवा पुरविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिाय यानिमित्ताने दिली आहे.