भाऊबीजेसाठी आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक घटना विलेपार्ल येथे घडली. काशीनाथ विश्वनाथ म्हस्के(४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा- विश्लेषण: आरे कॉलनीत बिबट्यांचे माणसांवर हल्ले का सुरू आहेत?
काशीनाथ अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरातील राहत होते. विलेपार्ले येथील बामवाडा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे ते भाऊबीजेसाठी गेले होते. बहिण घरी नसल्यामुळे ते काही काळ तिच्या घरी थांबले व त्यानंतर काही कामासाठी बाहेर जाऊन येतो असे सांगून काशिनाथ घरातून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने कुटुंबियांना दूरध्वनी आला. त्यात द्रुतगती मार्गावर काशिनाथला एका अनोळखी वाहनाने धडक दिल्याची माहिती दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिली. जखमी झालेल्या काशिनाथ यांना पोलिसांच्या मदतीने कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा- पाच वर्षांत पुनर्वसनातील घर विकण्यास परवानगी देण्याची घोषणा हवेतच
विलेपार्ले येथील सेंट्रल ब्रीज येथील उतारावर रस्ता ओलांडत असताना त्यांना अनोळखी वाहनाने धडक दिली. याप्रकरणी काशिनाथ यांचा भाऊ भगवान म्हस्के यांच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून काशिनाथच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.