प्राध्यापकांच्या संपाला न जुमानता ‘तृतीय वर्ष विज्ञान’च्या (बीएससी) विनाअनुदानित तत्त्वावरील विषयांबरोबरच मुख्य विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बोलाविलेली प्राध्यापकांची बैठक ‘बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’च्या (बुक्टू) कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे विभागाला शुक्रवारी गुंडाळावी लागली.
‘बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) या मुंबईतील प्राध्यापकांच्या संघटनेने ‘एमफुक्टो’ या राज्यस्तरीय संघटनेच्या बरोबरीने वेतनविषयक मागण्या पूर्ण झाल्याशिवाय विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे. बीएससीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा ४ मार्चपासून सुरू करण्याचा परीक्षा विभागाचा विचार आहे. त्यानंतर भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्र या मुख्य विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा होतील. नेमके किती शिक्षक या परीक्षांकरिता उपलब्ध होतील याचा अंदाज घेण्यासाठी परीक्षा विभागाने संबंधित विषयांच्या प्राध्यापकांच्या बैठका बोलाविल्या होत्या. मात्र, आंदोलनात सहभागी असलेले प्राध्यापकही आपली बाजू मांडण्याच्या उद्देशाने मोठय़ा संख्येने या ठिकाणी जमले. या प्राध्यापकांनी बैठकीत येऊन गोंधळ घालू नये म्हणून परीक्षा विभागाने मुख्य दरवाजे लावून घेतले. परिणामी सर्वच शिक्षकांना बाहेर थांबावे लागल्याने शेवटी विभागाला या बैठका गुंडाळाव्या लागल्या.
परीक्षा विभागात इतर कामानिमित्त आलेल्यांनाही या प्रकारामुळे हात हलवित परत जावे लागले. आंदोलनकर्त्यांनी अडविल्यानेच इतर प्राध्यापक आत येऊ शकले नाही, असे परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले. तर आम्हाला केवळ आमची बाजू मांडण्यासाठी आत जायचे होते. परंतु, दरवाजे बंद केल्याने आम्हाला बाहेरच राहावे लागले, असा खुलासा बुक्टूच्या मधू परांजपे यांनी केला.
दरम्यान मुख्य विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांकरिता किमान ४०० ते ५०० शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. परंतु, हे बहुतांश शिक्षक आंदोलनात सहभागी आहेत. परिणामी मुख्य विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची अनिश्चितता कायम आहे.

‘न्याय्य’ मागण्यांसाठी पाठपुरावा करू
शिक्षकांच्या ‘न्याय्य’ मागण्यांसाठी आता मुंबई विद्यापीठही राज्य सरकार आणि राज्यपालांकडे पाठपुरावा करणार आहे. परीक्षा मंडळाबाहेर झालेल्या गोंधळानंतर प्र- कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी आंदोलनकर्त्यां प्राध्यापकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी तुमच्या मागण्यांसाठी विद्यापीठातर्फेही पाठपुरावा केला जाईल, असे प्राध्यापकांकडे स्पष्ट केले.