ठाणे येथील रामचंद्रनगर परिसरात असलेल्या सूर्य दर्शन या चार मजली अनधिकृत इमारतीचा खांब शुक्रवारी खचल्याने शहरात खळबळ उडाली. महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीसह शेजारच्या इमारतीमधील एकूण ८४ कुटुंबांना बाहेर काढले आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत या इमारतीच्या बांधकामाची तपासणी तज्ज्ञ अभियंत्यांकडून करण्यात येत असून त्यांच्या अहवालानंतरच पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ठाणे येथील नितीन कंपनी जंक्शनजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरच १९ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सूर्य दर्शन ही इमारत आहे. या इमारतीला दोन ‘विंग’ असून त्यामध्ये ३४ कुटुंबे राहतात. तसेच दहा दुकाने आहेत.
या इमारतीच्या पाठीमागील बाजूचा खांब खचल्याने तिला तडे जात असल्याचे शुक्रवारी रहिवाशांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनाने इमारतीमधील ३४ कुटुंबांना घराबाहेर काढले. या इमारतीला खेटूनच तिजादीप ही तीन मजली इमारत असून त्या ठिकाणी तीन ‘विंग’मध्ये ५० कुटुंबे राहतात. तसेच इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे २० दुकाने आहेत. सूर्य दर्शन ही इमारत खचू लागल्याने तिजादीप इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीमधीलही सर्वच कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर काढण्यात आले आहे.
सूर्य दर्शन या इमारतीचा खांब खचल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे इमारतीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मदत कार्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी येथील वाहतूक बंद करून ती दुसऱ्या मार्गे वळविण्यात आली होती.

अहवालानंतरच निर्णय..
सूर्य दर्शन या इमारतीच्या बांधकामाची तपासणी महापालिकेच्या माध्यमातून तज्ज्ञ अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालानंतरच महापालिका पुढील निर्णय घेणार आहे. दुरुस्तीनंतर इमारत रहिवाशी वापरासाठी योग्य आहे, असा अहवाल आला तर दुरुस्तीनंतर रहिवाशांना इमारतीत राहता येऊ शकते. तसेच इमारत रहिवाशी वापरासाठी योग्य नाही, असे अहवालात स्पष्ट झाल्यास महापालिकेमार्फत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल. तसेच या इमारतीमधील रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.