मुंबई : बुलेट ट्रेन गाडय़ांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठे आगार भिवंडी तालुक्यातील दोन गावांत होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून भूसंपादन १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत यापैकी ३३ टक्के जमीन ताब्यात आली आहे. त्यामुळे आगाराचे कामही पुढे सरकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण १३९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये १,०२४.८६ हेक्टर खासगी आणि ३७१.१४ हेक्टर जमीन सरकारी आहे. महाराष्ट्रातील ४३३.८२ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. आतापर्यंत राज्यात ७२ टक्के भूंसपादन झाले आहे. यामध्ये आगारांसाठीही भूसंपादन करण्यात येत आहे.

बुलेट ट्रेन गाडय़ांची देखभाल व दुरुस्ती, गाडय़ा ठेवण्यासाठी जागा त्यासाठी विविध विभागांची कार्यालये, कार्यशाळा (वर्कशॉप) आदींसाठी मोठे आगार गुजरातमधील साबरमती आणि सुरत येथे उभारले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातही आगार बनणार असून त्यासाठी तालुक्यातील भारोडी आणि अंजूर या दोन गावांतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या आगारासाठी ५७.७६ हेक्टर जागा लागणार आहे. आतापर्यत सरकारी आणि खासगी असे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. सध्या ५७.७६ हेक्टरपैकी १९.३० हेक्टर म्हणजेच ३३ टक्के जमिनींचा ताबा मिळाल्याचे सांगितले. ही प्रक्रियाही जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

  • भिवंडी तालुक्यात बुलेट ट्रेनची देखभाल, दुरुस्ती व गाडय़ा उभे करण्यासाठी आगार 
  • आगाराची दररोज ३६ बुलेट ट्रेन गाडय़ा हाताळण्याची क्षमता 
  • २०१९ च्या सुरुवातीपासून भूसंपादनाला सुरुवात 
  • राज्यात ४३३.८२ हेक्टर जमीन संपादित करणार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train depot acquisition complete maintenance repairs departments land ysh
First published on: 25-07-2022 at 00:56 IST