निशांत सरवणकर

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सोडतीत विजेत्यांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापासून आता त्यांची सुटका होणार असून यासंबंधी प्रस्तावाला शासनाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. विजेत्यांना आता अवघ्या १५ दिवसांत घराचा ताबा मिळू शकतो.  म्हाडाच्या घरांची पुढील सोडत ही नव्या प्रस्तावानुसार काढण्यात येणार आहे. यामुळे विजेत्यांचा कुठल्याही स्वरूपात म्हाडा कार्यालयाशी संबंध येणार नाही. तर, त्यांना घराची निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी फक्त एकदा जावे लागणार आहे.

मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो शासनाने गेल्या आठवडय़ात मंजूर केला. म्हाडा घरांसाठी जाहिरात जारी झाल्यानंतर अर्ज ऑनलाइनच स्वीकारले जाणार आहेत. यापूर्वी अर्जासोबत २७ विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागत होती. ती संख्या आता सात करण्यात येणार असून अर्ज नोंदणीसाठी सात दिवस देण्यात येणार आहेत.  पात्रता व अपात्रता काही सेकंदात निश्चित केली जाणार आहे. नवव्या दिवशी सोडत काढली जाणार असून पात्र अर्जदारांचाच सोडतीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे सोडतीनंतर पात्र व अपात्रतेची टांगती तलवार राहणार नाही.

 यशस्वी अर्जदाराला त्याच्या मोबाइलवर संदेश पाठविला जाईल. त्यानंतर लगेच त्याच्या मेलवर तात्पुरते वितरण पत्रही पाठविले जाईल. विशेष म्हणजे पूर्ण रक्कम भरल्यानंतर त्याच वेळी ‘ई-रजिस्ट्रेशन’ होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर फक्त नोंदणीसाठी यशस्वी उमेदवाराने उपनिबंधकांच्या कार्यालयात उपस्थित राहावे लागेल, असे म्हसे यांनी सांगितले.  प्रतीक्षा यादीदेखील या नव्या संकल्पनेत रद्द करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नवा प्रस्ताव?

  • मोबाइलवर ओटीपी क्रमांक पाठवून अर्ज अधिकृत
  • अर्ज नोंदणीसाठी सात दिवस
  • २७ ऐवजी सात कागदपत्रेच द्यावी लागणार
  • पात्र व अपात्र काही सेकंदात निश्चित
  • अर्ज दाखल केल्यानंतर नवव्या दिवशी सोडत
  • यशस्वी उमेदवाराला मोबाइलवर संदेश
  • निशांत सरवणकर