राज्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्याच्या काळजीवाहू सरकारने सेफ अॅडव्हान्स काढून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी बेहाल झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या राज्यपालांसमोर मांडल्या. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, “अवकाळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे काळजीवाहू सरकारने जी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ती खूपच तुटपुंजी आहे. यासाठी २५ हजार कोटींपेक्षा अधिकची मदत गरजेची आहे. सोयाबिन, कापूस, कांदा, मका आणि तूर या पिंकाचेही मोठे नुकसान झाले आहे. खरिपाचं पीक पूर्णपणे वायाला गेलं आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घ्यावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली.”

इन्शूरन्स कंपन्या शेतकऱ्यांना मदत द्यायला तयार नाहीत. मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुसळधार पाऊस आणि समुद्रात वादळाची स्थिती असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ दिले जात नाही, त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने त्यांनाही भरपाई दिली पाहिजे. पशूधनाचंही मोठं नुकसान झालंय त्याचीही मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांचं वीजबीलही माफ करावं. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावेत, यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करुन आणि यंत्रणेला कामाला लावाव, अशी विनंतीही राज्यपालांना केल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, “कोल्हापूर, सांगलीत महापूर आला तेव्हा केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र केंद्राकडून अद्याप मदत पोहोचलेली नाही. याचप्रमाणे आत्ताचीही मदत पोहोचेल अशी आशा वाटत नाही. सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे मात्र, त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालावं.”