बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी नवी मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता गेसू खान आणि त्याच्या दोन पत्नींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांनी पदाचा गैरवापर करीत बेहिशेबी जमावल्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी खान यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु होती. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खान यांच्यासह त्यांच्या दोन पत्नीच्या नावे ४८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

खान हे १९८९ ते २००५ या कालावधीत महापालिकेमध्ये कार्यकारी अभियंता (वर्ग-१) म्हणून कार्यरत होते. १९६७ ते २०१० या कालावधीतील खान यांच्या मालमत्तेची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु होती. खान यांनी त्यांच्यासह बांधकाम व्यवसायिक पत्नी मोमिना खान (४१) आणि द्वितीय पत्नी फिरोजा खान (४७) यांच्या नावे उत्पन्नापेक्षा ४३. ४६ टक्के म्हणजे ४८ लाख २० हजार ९२९ रुपयांची संपत्ती जमा केली असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी खान यांच्यासह त्यांच्या दोन्ही पत्नींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.