मुंबई : फेसबुकवर लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उत्तराखंडमधील नैनिताल येथे २०२२ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. यापैकी काही चित्रिफिती या वांद्रे येथून अपलोड केल्याचे आढळल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलींचा समावेश असलेल्या ५० चित्रफिती (चाईल्ड पोर्नोग्राफी) २०२२ मध्ये फेसबुकवर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाचा मुख्य गुन्हा उत्तराखंडमधील नैनिताल येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नैनिताल पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. तीन वर्षांनंतर नैनीताल पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांची ओळख पटविण्यात यश मिळवले.

वांद्र्यातून अश्लील चित्रफिती अपलोड

या गुन्ह्यात सुमारे ५० बाल अश्लील चित्रफिती फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या होत्या. यातील काही चित्रफिती खेरवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व येथून अपलोड झाल्याचे मोबाइल टॉवरच्या लोकेशनवरून उघडकीस आले होते. त्यामुळे खेरवाडी पोलिसांनी नैनिताल येथील महिपाल महरा (२०) आणि उत्तर प्रदेशामधील जौनपूर जिल्ह्यातील आकाशकुमार गुप्ता (२५) या दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या अश्लील चित्रफिती आरोपी महिपाल महरा याच्या फेसबुक खात्यावरून ९ डिसेंबर २०२२ रोजी रात्री अपलोड करण्यात आल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बालकांचे लैंगिकदृष्ट्या स्पष्ट कृती दर्शवणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसारित केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनस) कलम ६७ (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैनिताल पोलिसांबरोबर खेरवाडी पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे काय ?

चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे १८ वर्षांखालील बालकाचे लैंगिक कृती दर्शवणारे, भडकवणारे किंवा लैंगिक उद्देशाने तयार केलेले चित्र, चित्रफिती, लेखन, ध्वनीचित्रफिती किंवा इतर कोणतेही डिजिटल किंवा मुद्रित माध्यम. त्यात १८ वर्षांखालील मुला-मुलींची नग्न किंवा अर्धनग्न छायाचित्रे, चित्रफिती, मुलांमधील लैंगिक संवाद असलेले चॅट्स, एनिमेटेड/कार्टून स्वरूपात असलेले अश्लील बालदृश्ये आदींचा समावेश असतो. अशा गुन्ह्यात ३ ते ७ वर्षांपर्यंत शिक्षा, आणि किंवा ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षेची तरदूत १० वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. बहुतांश देशात चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. भारत सरकारने चाईल्ड पोर्नोग्राफीची अनेक संकेतस्थळे बंद केली आहेत.