मुंबई : आभासी कैद अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात बॅंकेच्या व्यवस्थापकाचाही सहभाग आढळला असून या प्रकरणी मुंबईतील ॲक्सिस बॅंकेचा व्यवस्थापक नितेश राय याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. पोलीस असल्याचे भासवून नागरिकांना आभासी कैदेत (डिजिटल अरेस्ट) ठेवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे गुन्हे वाढले आहे.
अशाच एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने दोघांना अटक केली. या आरोपींनी फसवणुकीतून आलेली रक्कम बॅंकेत वळविण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत खाती उघडली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता ॲक्सिस बॅंकेचा व्यवस्थापक नितेश राय याचा त्यात सहभाग आढळला.
सायबर भामट्यांनी नितेश राय याच्या मदतीने उघडलेल्या तीन बनावट खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम वळवण्यात आली होती. याप्रकरणी नितेश रायला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानगी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत केली.
