केंद्रीय तपास संस्थेने (CBI) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्रसिंह तावडेच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला. याबाबत सीबीआयने आपली सविस्तर भूमिका सांगणारं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. यात त्यांनी म्हटलं, “आरोपी तावडेनेच दाभोलकर हत्येचा कट रचला आणि हत्येसाठी शार्प शुटरला सुपारी दिली. तो समाजासाठी धोका आहे.” तसेच या प्रकरणातील अनेक तपशील न्यायालयासमोर ठेवले.

सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं, “गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी सारंग अकोलकरने विरेंद्रसिंह तावडेला इमेल करून सनातन संस्थेच्या कामासाठी उत्तर प्रदेश आणि आसाममधून गावठी हत्यारं मिळवून १५००० लोकांची आर्मी उभी करण्यास सांगितलं होतं. आपलं ध्येय गाठता यावे म्हणून शस्त्रास्त्र कारखाना काढण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने अगदी बँक लुटण्याच्या पर्यायाचंही समर्थन केलं.”

“आरोपी तावडेला जामीन समाजाला मोठा धोका”

“विरेंद्रसिंह तावडेसह सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना सनातन संस्थेच्या ‘क्षात्र धर्म साधना’तील शिकवणीचं पालन आणि अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं होतं. यानुसार वैचारिक विरोधकांना राक्षस, हिंदू विरोधी, धर्मद्रोही, दुर्जन असल्याचं सांगत त्यांना संपवण्यास सांगितलं जात होतं,” असं सीबीआयने सांगितलं. यावेळी सीबीआयने आरोपींच्या जामिनाला विरोध करत ते समाजाला मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केलं.

हेही वाचा : सनातन ही दहशतवादी संघटना – आशिष खेतान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्यातून आरोपींनी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्थेला न आवडणाऱ्या गोष्टींवर क्रूरपणे उत्तर दिलं जाईल असा संदेश देण्यात आला. हे नागरिकांच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्यास पुरेसं कारण आहे. याचा समाजावर दहशतपूर्ण परिणाम होतो, असंही सीबीआयने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. तसेच या प्रकरणातील आरोपींचा कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप सीबीआयने केलाय.