मुंबईः राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांनी तपास केलेल्या दोन संबंधित प्रकरणाच्या निष्कर्षात मोठी तफावत आढळून आली आहे. याप्रकरणी परमबीर सिंह यांना सीबीआयकडून नुकताच दिलासा मिळाला आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया आणि त्यांचे भागीदार श्याम अग्रवाल यांच्यातील वादातून या प्रकरणी आरोप – प्रत्यारोप झाले होते. पुनमिया यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून व्यवसायिक मतभेद आणि श्याम अग्रवालच्या सांगण्यावरून छोटा शकीलकडून धमकीचे दूरध्वनी आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा सुरूवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत तपास करण्यात येत होता. त्यानंतर ते प्रकरण राज्य सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते.

त्यानंतर श्याम अग्रवाल यांनी जुलै २०२१ मध्ये मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल केला. त्यात जुहू प्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी पुनमिया यांच्यासह परमबीर सिंह व वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. याप्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर परमबीर सिंह यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी सपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करून सपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयने तपास करून नुकतेच पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात परमबीर सिंह यांना दिलासा दिला आहे. सीबीआय आणि सीआयडी यांचे निष्कर्ष वेगवेगळे असल्यामुळे प्रकरणात आणखी गोंधळ निर्माण झाला असून, तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सीबीआयडीच्या तपासातील माहिती

– श्यामसुंदर अग्रवाल, अझीझ नामक व्यक्तीसह इतर काही अज्ञात साथीदारांच्या मदतीने संजय पुनमिया यांना धमकीचे दूरध्वनी करण्यात आले होते.

– एका सायबर तज्ज्ञांच्या मोबाइल क्रमांकावरून धमकी देण्यात आल्याचा आरोप, पण त्याला आरोपी करण्यात आलेले नाही

– कोणत्या दिवशी धमकीचा दूरध्वनी आला ते स्पष्ट नाही.

– श्याम अग्रवाल व एक फरार आरोपी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

– या प्रकरणातील शकीलच्या सहभागाचा कोणताही पुरावा नसल्याने मोक्काअंतर्गत गुन्हा नाही

सीबीआयच्या तपासातील माहिती

– सीबीआयच्या तपासानुसार, आरोपी संजय पुनमिया याने पोलिसांशी संगनमत करून एक गुन्हेगारी कट रचला आणि त्याअंतर्गत जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली, त्यामध्ये या प्रकरणातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल याने छोटा शकीलच्या माध्यमातून त्याला धमकी दिली, असा आरोप करण्यात आला. – पुनमिया यांना आलेला धमकीचा दूरध्वनी छोटा शकीलने नाही, तर सायबर तज्ज्ञाच्या मदतीने करण्यात आला होता. त्यासाठी स्पूफ कॉलिंग ॲप्सचा वापर करण्यात आला होता, असे सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.