केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत राणे यांना झालेली अटक व पोलीस कारवाईनंतर पहिल्यांदाच राणे यांनी शहा यांच्याशी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर येत असून नक्षलीप्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर ठाकरे हे शहांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी घेतलेली अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.  जनआशीर्वाद यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानानंतर राणेंना अटक करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारकडून झालेली ही कारवाई व वागणुकीची माहिती राणेंनी शहांना दिली. जनआशीर्वाद यात्रेवरून परत आल्यानंतर लगेचच राणेंनी शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती.