मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या छोटय़ा स्थानकांवरील प्रवाशांनाही रेल्वेचे तिकीट मिळणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने पावले उचलली आहेत. मध्य रेल्वे या प्रवाशांसाठी ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली अमलात आणणार आहे. या प्रणालीनुसार या छोटय़ा स्थानकांमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तिकीट विक्रीतून काही टक्के वाटा या कर्मचाऱ्यांना मानधन म्हणून देण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे छोटय़ा स्थानकांवरील स्टेशन मास्तरांचा भार कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. ही योजना ११ स्थानकांवर राबवण्यात येणार आहे.
लांब पल्ल्यांच्या मार्गावरील छोटय़ा स्थानकावर स्टेशन मास्तरला तिकीट देणे, स्थानकाची जबाबदारी सांभाळणे, आरक्षण चार्ट तपासणे, प्रसाधनगृहाची किल्ली सांभाळणे असे अनेक व्याप असतात. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी १५ टक्के, १५ ते २० हजार रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी १२ टक्के आणि ५० हजार ते एक लाख रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी ४ टक्के वाटा मिळणार आहे. हे कंत्राटी कर्मचारी खंडाळा, कामण रोड, खारबांव, आपटा, जिते, सोमाटणे, पेण, नागोठणे, निळजे आणि तळोजा या स्थानकांवर तिकीट विक्री करतील. कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूकीसाठी जाहिरात देण्यात येईल. त्यानंतरच यांची नेमणूक करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.