दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन बंद पडल्याने बुधवारी सकाळी मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी पावणेआठच्या सुमारास डाऊन मार्गावरील स्लो ट्रॅकवर हा प्रकार घडला. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या या गाडीच्या तीन इंजिनांपैकी एक इंजिन अचानकपणे बंद पडल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे डाऊन दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या धीम्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदरांना आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही वाहतूक पुर्ववत होण्यासाठी आणखी एक तासाचा अवधी लागण्याचा अंदाज आहे.