अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी मध्यरात्रीनंतरही प्रवासाची सुविधा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जन करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेतर्फे विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. याशिवाय १२ सप्टेंबर रोजी मुंबई सेन्ट्रल ते चर्चगेटदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व स्थानकांत लोकल गाडय़ांना थांबाही देण्यात येणार आहे.

१२ सप्टेंबरला मध्यरात्री सीएसएमटी ते कल्याणपर्यंत दोन फेऱ्या, सीएसएमटी ते ठाणे एक, ठाणे ते सीएसएमटी दोन, सीएसएमटी ते पनवेल ते सीएसएमटीपर्यंत चार लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. तर चर्चगेट ते विरापर्यंतही आठ विशेष लोकल फेऱ्या चालविल्या. जातील. सायंकाळी पाच ते रात्री साडेआठपर्यंत मुंबई सेन्ट्रल ते चर्चगेटदरम्यान अप जलद लोकल सर्व स्थानकांत थांबतील. चर्निरोड स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल गाडय़ांना सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत थांबा देण्यात येणार नाही. परिसरातील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शेवटच्या दिवशी चर्निरोड स्थानकात गर्दी होते. फलाट क्रमांक दोनवर गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दोन नंबर फलाटावर लोकल गाडय़ांना थांबा देण्यात येणार नाही.