ऐन गर्दीच्या वेळी कोणता ना कोणता तांत्रिक बिघाड करून मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवण्याची दैनंदिन परंपरा मध्य रेल्वेने मंगळवारीही कायम राखली.
लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील बिघाडामुळे ही गाडी मस्जिद आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान मंगळवारी सकाळी बंद पडली. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी दोन तास लागले आणि ऐन गर्दीच्या वेळी उपनगरीय गाडय़ांची वाहतूक कोलमडली. मध्य रेल्वेवर हे तांत्रिक बिघाड दररोजच होत असूनही त्याबाबत मध्य रेल्वे प्रशासन आणि लोकसभा निवडणुकांआधी आरडाओरड करणारे खासदार सुशेगात आहेत.
गेले दोन-अडीच महिने मध्य रेल्वेवर सातत्याने काही ना काही तांत्रिक बिघाड होत आहे. त्यामुळे त्यांच्या उपनगरीय गाडय़ा एकही दिवस पूर्णपणे वेळेत चाललेल्या नाहीत. अनेकदा तर गाडय़ा २०-२५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद या तांत्रिक बिघाडांसाठी मेगाब्लॉक रद्द झाल्याची कारणे देत होते. मात्र आता मेगाब्लॉक घेऊनही मंगळवारी पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. ही गाडी सकाळी साडेआठच्या सुमारास डाऊन जलद मार्गावर येताना ही घटना घडली. परिणामी अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.  यामुळे अप व डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा अप व डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या. या दरम्यान जलद मार्गावरील गाडय़ा दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मंगळवारी मोहरमची सुटी असल्याने अनेक कार्यालये बंद होती. तरीही सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना या बिघाडाचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसला.

लोकप्रतिनिधींची डोळेझाक
मध्य रेल्वेवर हे बिघाड वारंवार होत असूनही त्याबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या बिघाडांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणे रेल्वे प्रशासनाला शक्य झालेले नाही. तसेच लोकसभा निवडणुकांआधी रेल्वे प्रश्नांवर भलतेच आक्रमक होत लोकांचे लक्ष वेधून घेणारे खासदारही निवडणुकांनंतर निपचित झाले आहेत.