भायखळा- चिंचपोकळी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक सोमवारी रात्री विस्कळीत झाली. रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जवळपास तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

भायखळा – चिंचपोकळी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये रात्री दहाच्या सुमारास बिघाड झाला. अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेडवायरवर वजनदार वस्तू फेकल्याने हा बिघाड झाल्याचे रेल्वेमधील सूत्रांनी सांगितले. वायरमध्ये बिघाड झाल्याने त्याचा फटका तिथून जाणाऱ्या पेंटाग्राफला बसला. यामुळे सीएसटीएम- खोपोली ही लोकल रखडली होती. त्या मागील कल्याण फास्ट लोकलही खोळंबली होती. खोळंबलेल्या लोकल गाड्यांमधील पंखे आणि दिवे बंद झाल्याने प्रवाशांमध्ये काही वेळेसाठी गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात रेल्वेच्या पथकाला यश आले.