मुंबईतील उपनगरीय सेवेच्या वक्तशीरपणाला प्राधान्य देण्याची भाषा रेल्वेमंत्री करत असताना प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेवर वक्तशीरपणाचे तीनतेरा वाजले आहेत. आठवडाभर चालू असलेल्या मध्य रेल्वेवरील बिघाडाच्या सत्रांनी शुक्रवारी कळस गाठला. ठाणे स्थानकात शुक्रवारी दोन ठिकाणी झालेल्या बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दोन तास उशिराने सुरू होती. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर या बिघाडाची दखल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना घ्यावी लागली. आता मध्य रेल्वेवर वारंवार होणाऱ्या बिघाडांचा अभ्यास करण्यासाठी रेल्वेबोर्डातर्फे एक समिती स्थापण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.
ठाणे स्थानकात फलाट क्रमांक एकवर ठाणे लोकल शिरत असताना नेमक्या रुळांच्या क्रॉसओव्हरवरच या गाडीचा पेंटोग्राफ तुटला. सकाळी ९.५३ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे कल्याणच्या दिशेने होणारी धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली. ही वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली खरी, मात्र त्यात भर म्हणून कल्याण दिशेकडे डाऊन जलद मार्गावरून डाऊन धीम्या मार्गावर दुसरी गाडी जात असताना तिथेही ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. परिणामी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने होणारी धीमी वाहतूकही बंद पडली.
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी काही काळ चारही मार्गावरील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर वीज पुरवठा चालू झाल्यावर दोन्ही दिशेने जलद मार्गावरील वाहतूक सुरू झाली. पण अप धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास दीड तास लागला. शेवटी ११.२० वाजता मुंबईकडे धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. तर कल्याणकडील धीम्या मार्गावरील वाहतूक १२.३० वाजता पूर्ववत झाली. मात्र या बिघाडाचा फटका मध्य रेल्वेवर संध्याकाळी उशिरापर्यंत जाणवत होता. या बिघाडादरम्यान दिवा ते ठाणे धीम्या मार्गावर नऊ गाडय़ा आणि मुलुंड-ठाणे धीम्या मार्गावर तीन गाडय़ा खोळंबल्या होत्या. रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार २० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रत्यक्षात ५०हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनाही फटका
या तांत्रिक बिघाडाचा फटका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना बसला. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या सहाव्या सत्राची परीक्षा सुरू असून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. या संदर्भात परीक्षा विभागाने संबंधित महाविद्यालयांनी उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यास सांगितले होते. मात्र या गोंधळामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास दोन ते तीन तास प्रवास करावा लागल्याने वेळ वाया गेल्याची खंत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.