डीसी-एसी परिवर्तनानंतर मध्य रेल्वेवरील उपनगरीय वाहतुकीचा बोजवारा वाजला असताना आता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. डीसी-एसी परिवर्तनानंतर सँडहर्स्ट रोड स्थानकानजीकच्या हँकॉक पुलाजवळ ताशी १५ किमीची वेगमर्यादा घातल्याने गाडय़ांचा वेग अत्यंत कमी झाला होता. मात्र आता मध्य रेल्वेने अप आणि डाउन जलद मार्गावरील वेगमर्यादा १५ वरून ३० किलोमीटर प्रतितास एवढी शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून रविवारपासून या गाडय़ा वेगातच धावत आहेत. परिणामी सध्या जलद मार्गावर २० मिनिटे उशिराने धावणाऱ्या गाडय़ा यापुढे फक्त आठ ते दहा मिनिटेच उशिराने धावतील.
डीसी-एसी परिवर्तनाला परवानगी देताना रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी नऊ ठिकाणी ताशी १५ किमीची वेगमर्यादा घातली होती. मात्र मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडून विशेष परवानगी घेत यातील आठ ठिकाणी ताशी ३० ते ५० किमी वेगाने गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र हँकॉक पुलाजवळ अप-डाउन धीम्या आणि अप-डाउन जलद अशा चारही मार्गावरील गाडय़ा ताशी १५ किमी वेगाने धावत होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाला चांगलाच फटका बसला होता.
मात्र आता मध्य रेल्वेने आपल्या अधिकारांमध्ये हँकॉक पुलाजवळील वेगमर्यादा काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त अप-डाउन जलद मार्गासाठीच लागू असेल. या निर्णयानुसार रविवारपासून या मार्गावरील गाडय़ा ३० किमी प्रतितास या वेगाने धावतील, तर धीम्या मार्गावरील गाडय़ा मात्र ताशी १५ किमी वेगानेच धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.