रेल्वेचे वेळापत्रक बदलले की सर्वप्रथम आपण वाट पाहतो ती एम-इंडिकेटर हे अ‍ॅप अद्ययावत होण्याची. मध्य रेल्वेचे वेळापत्रक बदलून चार दिवस उलटले तरी हे अ‍ॅप अद्ययावत न झाल्याने अनेकांच्या गाडय़ाही चुकल्या. पण मंगळवारी रात्री उशिरा हे अ‍ॅप गुगल प्लेवर अद्ययावत करण्यात आले आहे. या अद्ययावत अ‍ॅपमध्ये आता ‘कूल कॅब’चे दरपत्रकी देण्यात आले आहे.
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचे अचूक वेळापत्रक आपल्या मोबाइलवर उपलब्ध करून देणारे एम-इंडिकेटर हे अ‍ॅप लाखो मुंबईकरांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या अ‍ॅपमध्ये केवळ लोकलचे वेळापत्रक नूसन रिक्षा, टॅक्सी, मेट्रो, मोनो, फेरीबोट, एक्स्प्रेस गाडय़ा आदी मुंबईशी संबंधित वाहतूक सेवांची माहिती त्यांचे तिकीट दरांची माहिती उपलब्ध आहे. यामध्ये आता ‘कूल कॅब’चीही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये ‘कूल कॅब’चा प्रवास आणि दराची माहिती मिळणार आहे. तसेच यामध्ये विविध वाहतूक व्यवस्थांची तुलना करणारी सुविधाही देण्यात आल्याच एम-इंडिकेटरचे सचिन टेके यांनी स्पष्ट केले. यामध्ये आपण सध्या असलेल्या ठिकाणाहून आपल्याला जायच्या असलेल्या ठिकाणाचे नाव दिल्यानंतर आपल्यासमोर एक नकाशा येतो व त्या ठिकाणी जाण्यासाठी कूल कॅब, रिक्षा, साधी टॅक्सी या वाहतूक पर्यायांनी प्रवास करण्यास किती खर्च येईल याचा तपशीलही उपलब्ध होणार आहे.