परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा

मुंबई : परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना आणि टोकियोमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा २८ दिवसानंतर आणि ८४ दिवसांच्या आत घेण्याची मुभा केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या मात्रेमुळे अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार, कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा १२ ते १६ आठवडय़ानंतर म्हणजे ८४ दिवसांनतर घेता येणार आहे. परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी विशिष्ट दिवसांमध्ये हजर होणे आवश्यक असणाऱ्यांपुढे मात्र या नव्या नियमामुळे पेच निर्माण झाला होता. यासंबंधी अनेक तक्रारी आरोग्य विभागापर्यंत गेल्यानंतर विभागाने यात फेरबदल केले आहेत.

कोविन अ‍ॅपमध्ये या व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी या गटातील व्यक्तींना संबंधित कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या व्यक्तींच्या लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून पारपत्राची नोंदणी करावी. जेणेकरून लसीकरण प्रमाणपत्रावर पारपत्राचा क्रमांक नोंद होईल. आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने पारपत्र क्रमांक आणि लसीकरण प्रमाणपत्र यांना जोडणारे वेगळे प्रमाणपत्र द्यावे अशी सूचनाही केलेली आहे. ही सुविधा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत लागू असेल असेही नमूद करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे 

’ विद्यापीठात प्रवेश झाल्याची कागदपत्रे

’ परदेशात शिकत असणारे परंतु सध्या भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत जाण्याची कागदपत्रे

’ मुलाखत किंवा नोकरीमध्ये नियुक्ती झाल्याची कागदपत्रे

’ टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी नामांकित झालेल्याची कागदपत्रे