मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा उच्च व तंत्र शिक्षण विभाग व शुल्क नियामक प्राधिकरणाने दिला आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात सहज तक्रार करता यावी याची काळजी घेण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या लाॅगिन आयडीमध्ये तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात तक्रार करण्याची विद्यार्थी व पालकांची अडचण दूर होणार आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक महाविद्यालयांकडून पुढील शैक्षणिक वर्षासह अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने, तसेच शुल्क नियामक प्राधिकरणने अतिरिक्त शुल्काची मागणी करणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लाॅगिनमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये तक्रार करण्यासाठी ‘तिकीट लिंक’ उपलब्ध करण्यात आली आहे. या ‘तिकीट लिंक’वर विद्यार्थ्यांनी पावती, नोटिस, पत्रव्यवहार असे संबंधित पुरावे सादर करून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित महाविद्यालयाविरोधात योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
अशी करता येईल ऑनलाईन तक्रार
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://portal.maharashtracet.org/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीमध्ये त्यांना ‘टिकीट’ पर्याय देण्यात येणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यावर कॅप हा पर्याय निवडावा. त्यानंतर अभ्यासक्रमाची निवड करून त्यामध्ये तक्रारीच्या प्रकारामध्ये ‘कॅप चौकशी’ हा पर्याय निवडावा. तक्रारीच्या उपप्रकारामध्ये ‘महाविद्यालय शुल्क तक्रार’ हा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडावा. त्यात विद्यार्थ्यांना आपली सविस्तर तक्रार नमूद करता येईल. ‘तिकीट तयार करा’ या पर्यायावर क्लिक करून विद्यार्थ्यांना आपली तक्रारी दाखल करता येणार आहे.
तक्रारीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकही उपलब्ध
महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलप्रमाणेच मोबाइल क्रमांकही उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्कासंदर्भात मोबाइल क्रमांक ७७००९१९८९४ वर तक्रार करता येणार आहे. या मोबाइल क्रमांकावर सुटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान तक्रार करता येणार आहे.