१३ जिल्ह्य़ांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊस

मुंबई : बंगालच्या उपसागरात वायव्येला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील दोन दिवसांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्य़ांत घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये सरासरी गाठली असली तरी अजूनही १३ जिल्ह्य़ांमध्ये सरासरीइतका पाऊस पडलेला नाही. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये पावसाच्या प्रमाणात सरासरीपेक्षा उणे ५९ ते उणे २० टक्क्यांची कमतरता नोंदवली आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिकमध्ये सरासरीपेक्षा २० ते ६० टक्के पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला, तर उर्वरित जिल्ह्य़ांमध्ये सरासरीइतका पाऊस झाला.

बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे पुढील दोन दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला राहणार असून प्रतिताशी ६० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईचे जुलै महिन्यातले उच्चांक

जुलै महिना मुंबईकरांसाठी हवामानातील अनेक वैविध्य असणारा ठरला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच सांताक्रूझ केंद्रावर जुलैमधील ४४ वर्षांतील द्वितीय क्रमांकाच्या पावसाची (३७५.२ मिमी) नोंद झाली. तर सांताक्रूझ केंद्रावरील जुलै महिन्यातील ६० वर्षांतील सर्वाधिक तापमान (३६.२ अंश सें.) नोंदवण्यात आले होते. महिना संपताना सांताक्रूझ केंद्रावरील महिनाभरातील एकूण पावसाच्या नोंदीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सांताक्रूझ केंद्रावरील जुलै महिन्यातील सर्वाधिक एकूण पावसाची नोंद (१४६८.५ मिमी) २०१४ मध्ये झाली आहे. या वर्षी जुलै महिन्यात एकूण १४६४.८ मिमी नोंदवण्यात आली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रावरील जुलै महिन्यातील पावसाची नोंद सरासरीपेक्षा दुप्पटीच्या जवळ पोहचली आहे.