रेल्वेमंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी; दसरा मेळाव्यात शिवसेनेला कोलीत, काँग्रेसची भाजपवर टीका

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ प्रवाशांच्या मृत्यूनंतर या दुर्घटनेबद्दल मित्रपक्ष शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी भाजपला जबाबदार धरले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. या दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे जखमींची विचारपूस करण्याकरिता केईएम रुग्णालयात गेले असता शिवसैनिकांनी रेल्वेमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेल्वे दुर्घटनेवरून शिवसेनेने भाजपवरच सारे खापर फोडले. अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे या दोन खासदारांनी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील अरुंद पुलाच्या रुंदीकरणाच्या मागणीकडे लक्ष वेधले होते, पण केंद्रातील भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

सरकारचे अपयश, काँग्रेसचा आरोप

परळ, एलफिन्स्टन रोड व आसपासच्या परिसरात उत्तुंग टॉवर्स उभे राहिले आणि व्यापारी वापर वाढला. नोकरदारांची संख्या वाढल्यावर त्या दृष्टीने पायाभूत सुविधा उभारण्याचे सरकारचे काम होते. पण भाजप सरकारला सामान्य प्रवासी किंवा नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त बुलेट ट्रेनमध्ये रस आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुंबईतून रेल्वे खात्याला सर्वाधिक महसूल मिळतो, पण त्या मुंबईतील रेल्वे प्रश्नाकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. मुंबईकरांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची अपेक्षा आहे, पण भाजप सरकारला श्रीमंत वर्गाची जास्त काळजी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

दसरा मेळाव्यात पडसाद उमटणार

  • सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता वाढली आहे. भाजपकडून महत्त्व दिले जात नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यातूनच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.
  • सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे अधूनमधून शिवसेनेकडून दिले जातात. दसरा मेळाव्यात भाजपबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे शिवसेनेने सूचित केले आहे.
  • रेल्वे दुर्घटनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपला लक्ष्य करण्याची संधी सोडणार नाहीत. मुंबईकरांच्या दृष्टीने उपनगरीय सेवा महत्त्वाची आहे. बुलेट ट्रेनवरून ठाकरे हे उद्या भाजपवर तोफ डागतील, असे सांगण्यात आले.
  • एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेमध्ये मृत्युतांडव झाल्यानंतर काही काळ पीडित आणि बघ्यांची या परिसरामध्ये गर्दी होती. ती ओसरल्यानंतर मात्र हा चप्पल, बॅगांचा उरलेला खच या परिसराला भयावह बनवत होता.
  • मध्य रेल्वेकडून दसऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्य इमारतीवर विद्युत रोषणाई केली जाते. मात्र शुक्रवारी घडलेल्या दूर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर ही रोषणाई करण्यात आली नव्हती.
  • फलाटावर लोकल आल्यानंतर आधी उतरणारयांना उतरू द्यावे मग जगणारयांनी चढावे, असा नियम आहे. मेट्रोमध्ये हा नियम पाळला जातो. पण घाईच्या वेळेत हा संयम पाळला तर मागची गर्दी एकतर तुम्हाला रेटून आत नेते किंवा बाजूला फेकून स्वत आत चढते. आपण आत चढायला जातो तोवर लोकलही सुटलेली असते. हे सर्वसाधारणपणे सर्वच रेल्वे स्थानकांवरील चित्र आहे. निश्चितच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखल्यास त्याप्रमाणे वागल्यास अशा घटना टाळता येतील, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांकडून शुक्रवारी व्यक्त होत होती.