सीमाभागातील मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकार षंढ आणि नामर्द असल्याची टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही भाषा संजय राऊतांना शोभत असून जेलमध्ये राहिल्याने इतर कैद्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारने अडीच वर्षात हा मुद्दा का सोडवला नाही, असा प्रश्नही विचारला.

हेही वाचा – राऊतांच्या ‘नामर्द सरकार’ टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “स्वत:ला उपमा देण्याचे…”

“ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही”

“मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकार षंढ आहे, नामर्द आहे म्हणणं ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही. मर्दांगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे-फडणवीसांमध्ये आहे, हे राऊतांना माहिती आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे सामाजिक वातावरण अशांत करून होत नाही”, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना दिले आहे.

“अडीच वर्षांत सीमाप्रश्न का सोडवला नाही”

“मागचे अडीच वर्ष तुमचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मग सीमाप्रश्नाबाबत त्यांनी काय प्रयत्न केले? हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना सीमाभागात तणाव निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी फोडणे, गाड्या फोडणे, हे लोकशाहीची लक्षणं नाही. त्यांनी गोटा मारला म्हणून आपण वीट मारायची हे योग्य नाही. यापेक्षा मी सरकारला विनंती केली आहे की, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी आणि हा विषय लवकरात लवकर सोडवण्याच प्रयत्न करावा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”

“संजय राऊतांवर इतर कैदांचा प्रभाव”

“संजय राऊत जी भाषा बोलत आहेत, कदाचित जेलमध्ये राहल्याने इतर कैद्याकडून त्यांनी ही भाषा शिकली असावी. षंढ, नामर्द, आमदारांना रेडा म्हणणे, हा कदाचित इतर कैद्यांबरोबर राहल्याचा प्रभाव असू शकतो. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, हे माहिती नाही. महाराष्ट्र अशी वाक्य सहन करत नाही. सकाळी येऊन वाईट बोलने एवढच काम सध्या संजय राऊतांना आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राऊतांनी फडणवीसांना आव्हान देऊ नये”

“मातोश्रीमसोर हनुमान चालिसा म्हणू म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, त्यांना वाईट वागणूक दिली. ही खरी हा षंढपणा आहे, ही खरी नामर्दांगी आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संयमाने काम करत आहेत. त्यामुळे राऊतांनी त्यांना आव्हान देऊ नये. राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये”, असेही ते म्हणाले.