भाजपची आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : पालिकेच्या प्रभागांच्या फेररचनेमध्ये मुंबईतील २२७ पैकी तब्बल १४८ प्रभागांच्या सीमांमध्ये फेरफार करण्यात आले असून साधारण १६९ प्रभागांतील काही भाग अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची बाब भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आली असून या संदर्भात तयार केलेला अहवाल भाजपने पालिका आयुक्तांना सादर केला आहे. परिणामी, प्रभाग फेररचना वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग फेररचना करण्यात आली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रभाग फेररचनेचा अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे. मुंबईमधील बहुतांश प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील २२७ प्रभागांपैकी १४८ प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या आहेत. तर १६९ प्रभागांमधील काही भाग अन्य भागांना जोडण्यात आला असल्याचे भाजपच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग रचना उत्तरेकडून इशान्येला आणि पूर्वेकडून पश्चिमेला, अखेरच्या टप्प्यात दिक्षणेला करणे क्रमप्राप्त होते. मात्र मुंबईच्या उत्तर दिशेपासून प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे. ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

नव्या प्रभाग रचनेमुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना करताना मुख्य रस्ते, रेल्वे मार्ग, नाला आदी विचारात घ्यायला हवे होते. परंतु तसे न झाल्याने काही प्रभाग पालिकेच्या दोन विभाग कार्यालयांच्या हद्दीत विभागले गेले आहेत. तसेच काही इमारती, झोपडपट्टी, चाळींची तशीच अवस्था झाली आहे. आताच्या प्रभागांमधील काही भाग जुन्या प्रभागांमध्ये समाविष्ट झाला आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भाजप नगरसेवकांचे म्हणणे  आहे.

मुंबईमधील बहुतांश सर्वच प्रभागांच्या सीमारेषा बदलल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सीमा बदलल्या आहेत. यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर मतदारांचाही गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.