मुंबई : जोरदार पावसामुळे कोकण रेल्वेवरील दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे वीर ते उडुपी या ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेगाड्यांचा वेग कमी होतो. परंतु आता २० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी असून २१ ऑक्टोबर रोजीपासून नियमित वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे तसेच त्यांचा वेगही वाढणार आहे.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे रेल्वे मार्ग खोळंबतो. तसेच मोठा रेल्वे अपघात होण्याची शक्यता असते. कोकणातील एकेरी रेल्वे वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये, यासाठी दरवर्षी कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत असते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी कामे चोख पार पाडल्याने व इतर कामे पूर्ण झाल्याने, कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली. तसेच १० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तर, २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे नियमित वेळापत्रक २१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन (दैनिक)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस (दैनिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
दादर टर्मिनस ते सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (दैनिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन (आठवड्यातून ४ दिवस)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्स्प्रेस (आठवड्यातून ६ दिवस)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस (दैनिक)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन तेजस एक्स्प्रेस (आठवड्यातून ५ दिवस)
दिवा जंक्शन ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस (दैनिक)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस (दैनिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस (दैनिक)
दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर (दैनिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस (दैनिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्स्प्रेस (द्विसाप्ताहिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम (द्विसाप्ताहिक)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन वातानुकूलित दुरंतो एक्स्प्रेस (द्विसाप्ताहिक)
दादर ते तिरुनेलवेली एक्स्प्रेस (साप्ताहिक)