मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ईडीने विशेष सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. या गैरव्यवहारातील सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये चव्हाण यांच्याकडे गेल्याचा आरोप असून त्याबाबत ईडी तपास करीत आहे. सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने १७ जानेवारी रोजी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

न्यायाधीश एमजी देशपांडे यांच्यासमोर हे आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणातील गैरव्यवहार रकमेतील सुमारे एक कोटी २५ लाख रुपये चव्हाण यांच्या वैयक्तिक बँक खात्यात आणि १० लाख रुपये त्यांची भागीदारी असलेली कंपनीच्या बँक खात्यात वळविण्यात आले. या रक्कमेचा वापर चव्हाण यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी केला, असा आरोप आहे.

हेही वाचा – राज्यातील शाळांतील शिक्षकांना आता ‘ड्रेसकोड’, कोणत्या कपड्यांना बंदी?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खिचडी वितरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात फसवणूक, फौजदारी, विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – विदर्भात तीन दिवस पावसाचे

सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधित खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाण, तसेच खिचडीचे कंत्राटदार आदी एकूण आठ जणांवर छापे टाकण्यात आले होते.