मुंबई : सांताक्रूझ-चेंबूरदरम्यानच्या प्रवासातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने छेडानगर परिसरात उड्डाण पूल बांधला असून तो सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे सांताक्रूझ-चेंबूरदरम्यानचा प्रवास झटपट होईल, असा दावा करण्यात येत आहे. या पुलामुळे ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने छेडानगर रस्ते सुधार प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडानगर येथे तीन उड्डाण पूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यातील पहिला तीन मार्गिकेचा पूल ६३८ मीटर लांबीचा असून हा शीव ते ठाणे पट्टय़ाला जोडणारा आहे. दुसरा दोन मार्गिकेचा उड्डाणपूल १२३५ मीटर लांबीचा असून हा पूल मानखुर्द रोड ते ठाण्याला थेट जोडणारा आहे. तर तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडानगर उड्डाणपूल सांताक्रुझ ते चेंबूर जोडरस्त्याला जोडणारा आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या प्रकल्पातील ६३८ मीटर लांबीच्या छेडानगर उड्डाणपुलाचे काम मागील महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाले. त्यामुळे हा पूल मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र थाटामाटात उद्घाटन करत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. पण मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन पर्यायाने पूल वाहतुकीसाठी खुला करणे रखडले होते. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएवर टीका होत होती. त्यामुळे सरतेशेवटी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटनाची वाट न पाहता पूल खुला करावा असे आदेश एमएमआरडीएला दिले. या आदेशानुसार सोमवारपासून छेडानगर उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.  हा पूल खुला झाल्याने छेडानगर येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. आता या प्रकल्पातील उर्वरित दोन पूल केव्हा सुरू होतात याकडे  लक्ष लागले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chheda nagar sclr flyover thrown open to public zws
First published on: 16-03-2022 at 01:17 IST